हिरव्या भाज्या खाल्ल्याचे 10 जबरदस्त फायदे

हिरव्या भाज्या खाल्ल्याचे 10 जबरदस्त फायदे: आपण सगळेच जाणतो कि, “आरोग्य हेच खरं धन” आहे . पैसा, सोने, मालमत्ता, दागिने सगळं बाजूला पडतं, जर तब्येत बरी नसेल. गावाकडं अजूनही लोकं शेतातली ताजी भाजी तोडून, थेट चुलीवर शिजवून खातात.

पालक, मेथी, शेवग्याची पानं, गवार, कारली, चाकवत, कोथिंबीर या भाज्यांची खरी चव आणि ताकद त्यांनाच कळते. म्हणूनच त्यांच्या अंगात कस दिसतो, कामाची हिंमत दिसते आणि रोगपण कमी दिसतात.

पण आजकाल शहरातलं चित्र वेगळंच आहे. फास्टफूड, पिझ्झा-बर्गर, बाहेरचं तेलकट आणि चटकदार खायला लागलंय. जेवणातल्या ताटात हिरवी भाजी शोधायलाही दिवा लागतो. पण खरी ऊर्जा, खरं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवायचं असेल तर हिरव्या भाज्या रोज खाणं भागच आहे.

चला तर मग बघूया हिरव्या भाज्या खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात.

हिरव्या भाज्या खाल्ल्याचे मस्त फायदे :

शरीराला पोटभर पोषण मिळतं

मंडळी,हिरव्या भाज्या म्हणजे जणू पोषणाचं सोन्याचं भांडंच आहे. पालक, मेथी, चाकवत, शेवग्याची पानं यात विटामिन A, C, K, कॅल्शियम, लोह, फायबर भरपूर असतं. ही भाजी खाल्ली की शरीराला लागणारं सगळं पोषण एकदम भरून मिळतं.

आजकाल लोकं महागडी टॉनिक्स, प्रोटीन पावडर, गोळ्या घेतात. पण खरं सांगतो, रोजच्या जेवणात भाजी असेल ना, तर ह्या सगळ्या वस्तूंची गरजच नाही. आपलं शरीर मस्त तगडं होतं, अंगात जोश येतो, आणि काम करण्याची ताकद वाढते.

रक्त शुद्ध होतं

पालक, चाकवत, शेवग्याची पानं या भाज्या म्हणजे लोहाचा खजिना. हे लोह शरीरात गेलं की रक्त वाढतं, आणि सगळं रक्त शुद्ध राहतं.

ज्यांना अॅनिमिया, चक्कर येणं, थकवा असतो त्यांच्यासाठी या भाज्या एकदम औषधच. म्हणूनच गर्भवती बायकांना डॉक्टर नेहमी सांगतात, “दररोज हिरवी भाजी खा, आईचंही आणि बाळाचंही आरोग्य टिकेल.”

हे पण वाचा: आरोग्यासाठी वाईट असलेल्या 5 सवयी टाळा

पचन सुधारतं

हिरवी भाजी म्हणजे फायबरचं घर आहे. हे फायबर पोटाला मस्त कामाला लावतं. त्यामुळे पोट साफ राहतं, मलावरोध (बद्धकोष्ठता) होत नाही.

ज्यांना गॅस, अॅसिडिटी, आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांना तर हिरवी भाजी रोज खाणं फारच गरजेचं. एकदा भाजी खायला लागलात की पोटाचे सगळे त्रास जाऊन तुम्हाला हलकंफुलकं वाटायला लागतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हिरव्या भाज्यांमधल्या अँटिऑक्सिडंट्स म्हणजे शरीराचं कवच आहे. हे कवच असलं की बाहेरचे रोगजंतू, संसर्ग, सर्दी-खोकला, ताप वगैरे सहज येत नाहीत.

आजच्या धावपळीच्या आणि प्रदूषणाच्या काळात हे खूप गरजेचं आहे. औषधं खाण्यापेक्षा रोजच्या ताटात हिरवी भाजी ठेवा. म्हणजे शरीर आतूनच बलवान राहील.

खरं तर हिरव्या भाज्या म्हणजे नैसर्गिक औषधच आहे. पैसा खर्च करायची गरजच नाही, शेतातली थोडीशी भाजी खाल्ली की शरीर मस्त तगडं राहतं.

हाडं मजबूत होतात

मेथी, पालक, शेवग्याची पानं या भाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. हे कॅल्शियम अंगात गेलं की हाडं घट्ट आणि मजबूत होतात. ज्यांना सांधे दुखी, कंबरदुखी, गुडघ्यातील वेदना आहेत त्यांच्यासाठी ही भाजी औषधासारखी काम करते.

म्हातारपणी सगळ्यांनाच भीती असते. “हाडं झिजतील, चालणं-बोलणं अवघड होईल”. पण जरुण वयापासूनच हिरवी भाजी अंगीकारली, तर म्हातारपण हलकं-फुलकं होतं. हाडं ठिसूळ होत नाहीत, पायात दम राहतो, आणि काम करण्याची ताकद वाढते.

हे पण वाचा: रोज चालण्याचे (Walking) 10 फायदे: वजन कमी, तणाव दूर आणि आयुष्य निरोगी

वजन नियंत्रणात राहतं

आजकाल वजन वाढणं ही मोठी एक डोकेदुखी आहे. जिम, डाएट, गोळ्या लोक काय काय करत नाहीत! पण खरं तर वजनावर ताबा ठेवायचं असेल तर हिरवी भाजी सर्वोत्तम आहे.

हिरव्या भाज्यांत कॅलरी कमी असतात, पण फायबर जास्त असतं. म्हणजे जेवणानंतर पोट भरल्यासारखं वाटतं, पण वजन वाढत नाही. जितक्या भाज्या खाल तितक्या आरोग्यासाठी चांगल्याच आहे. कारण या भाज्या कधीच चरबी वाढवत नाहीत.

म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी भाजी म्हणजे खरंच स्वर्गसुखच आहे.

त्वचा तजेलदार दिसते

चेहऱ्याचं सौंदर्य म्हणजे फक्त बाहेरून क्रीम-लोशन लावून मिळत नाही, ते आतून पोषण मिळालं की खरं दिसतं. हिरव्या भाज्यांत विटामिन C आणि E असतं, ज्यामुळे चेहरा उजळतो, पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.

महागडी ब्युटी पार्लर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा रोज भाजी खा, याने परिणाम जास्त आणि टिकाऊ मिळतो. गावाकडं बघा, बायकांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसतं. कारण त्या लोकं जास्तीत जास्त भाजी खातात, बाजारची बनावटी वस्तू कमी वापरतात.

डोळ्यांचं आरोग्य सुधारतं

पालक, शेवग्याची पानं यांत विटामिन A मुबलक प्रमाणात असतं. हे डोळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते, नंबर लवकर वाढत नाही, आणि डोळ्यातली जळजळ किंवा कोरडेपणा कमी होतो.

आजकाल मोबाईल, टीव्ही, संगणक यामुळे डोळ्यांवर ताण खूप वाढलाय. अशा वेळी हिरवी भाजी म्हणजे डोळ्यांना दिलेला नैसर्गिक उजेड आहे. म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी पालक-मेथी-शेवग्याची पानं जरूर खायला हवीत.

हे पण वाचा: सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचे फायदे,जाणून घ्या !

हृदय निरोगी राहतं

हिरव्या भाज्या खाणं म्हणजे हृदयाला रोज रोज कवच चढवणं आहे. या भाज्यांमध्ये असलेलं फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स रक्तातील खराब चरबी (कोलेस्ट्रॉल) कमी करतात. त्यामुळे रक्त नसा मोकळ्या राहतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाला फारसा त्रास होत नाही.

आजकाल बाहेरचं तेलकट, मसालेदार खाऊन लोकांना ब्लॉकेज, स्ट्रोक, हार्ट अटॅक वगैरे त्रास लवकर होतो. पण जर रोजच्या ताटात थोडं चाकवत, गवार, कारली असेल ना, तर हृदयाचं नैसर्गिक रक्षण होतं.

गावाकडं बघा,लोकं दिवसभर शेतात धूपात काम करतात, तरीही त्यांचं हृदय एकदम टणक असतं. कारण त्यांच्या जेवणात हिरव्या भाज्या भरपूर असतात.

आयुष्य लांब होतं

जगभरातले शास्त्रज्ञही हे मान्य करतात. हिरव्या भाज्या रोज खाणारे लोक जास्त निरोगी, जास्त आनंदी आणि जास्त काळ जगतात.

ज्यांच्या ताटात हिरव्या भाज्या असतात त्यांना म्हातारपणी जास्त आजार त्रास देत नाहीत. अंगात ताकद टिकते, मन प्रसन्न राहतं, आणि आयुष्य खरंच सुखाने जातं. म्हणून जर म्हातारपण हलकं-फुलकं घालवायचं असेल तर भाजी शिवाय दुसरा पर्यायच नाही.

हिरव्या भाज्यांमध्ये काय काय खाऊ शकतो?

आपल्या आजूबाजूला इतक्या भाज्या आहेत, पण आपण फक्त पालक-मेथीपुरतं थांबतो. खरं तर हिरव्या भाज्यांचे बरेच प्रकार आहेत.

1. पानांच्या भाज्या

  • पालक – सूप, वरण, पालेभाजीला भारी.
  • मेथी – पराठा, भाजी, वरणात टाकली तर चव वाढते.
  • चाकवत – साधी पालेभाजी, वरण किंवा पिठलं.
  • शेवग्याची पानं – वरण, थालिपीठ, कढीत वापरतात.
  • अळूची पानं – पातळं, पाटवडीला भारी लागतात.
  • कोथिंबीर – चटणी, भाकरीसोबत, सजावटीला.
  • कांद्याची पात – पराठा, भजी, भाजी.

2. शेंगांच्या भाज्या

  • गवार – साधी भाजी किंवा रस्सा.
  • चवळी – वरण, पालेभाजी.
  • शेवगा शेंगा – आमटी, रस्सा, वरण.
  • हरभऱ्याच्या शेंगा – मिसळ, भाजी.

3. कडवट पण उपयोगी भाज्या

  • कारलं – भाजी, रस्सा, भाजून खाल्लं तरी चालतं.
  • कडुनिंबाची पानं – चटणी, पातळं, वरणात घातली तर शरीराला औषधासारखी काम करतात.

4. इतर भाज्या

  • दोडकं, पडवळ, घोसाळं – रस्सा, भाजी, कोशींबीर.
  • कोबी, पत्ताकोबी – पराठा, कोशिंबीर, साधी भाजी.
  • माठ (लाल/हिरवा) – वरण, पालेभाजी.


भाज्या फक्त एक-दोन प्रकारच्या नाहीत. रोज ताटात वेगवेगळ्या भाज्या घालून खाल्ल्या की शरीराला सगळं पोषण मिळतं. महागड्या टॉनिकची गरज नाही, भाजी म्हणजेच खरं टॉनिक आहे.

निष्कर्ष:

हिरव्या भाज्या म्हणजे निसर्गानं दिलेली मोफत औषधं आहेत. गावाकडं लोकं अजूनही रोज हिरव्या भाज्या खातात, म्हणून त्यांच्या अंगातली ताकद, चेहऱ्यावरचा तेज, आणि काम करण्याची ऊर्जा एकदम वेगळीच दिसते.

म्हणूनच आपणही आजपासून ठरवू या “दररोज थोड्या थोड्या का होईना, पण हिरव्या भाज्या नक्की खायच्या!”

तुम्हाला कोणती भाजी सर्वात जास्त आवडते ? कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

FAQ :

1. रोज किती हिरव्या भाज्या खाव्यात?

दिवसातून एक वेळ तरी हिरव्या भाज्या नक्की खाव्यात.

2. मुलांना कोणत्या हिरव्या भाज्या द्याव्यात?

पालक, शेवगा पानं, मेथी, गवार या हलक्या भाज्या उत्तम आहेत.

3. बाजारात मिळणाऱ्या भाज्यांवर औषधं असतात, काय करावं?

नीट धुवून, मीठ-पाण्यात भिजवून मगच शिजवावं.

4. कच्च्या भाज्या खाऊ शकतो का?

काही (काकडी, टोमॅटो, लेट्यूस) चालतात. पण पालेभाज्या शिजवूनच खाल्ल्या तर जास्त सुरक्षित ठरेल.

5. वजन कमी करायला कोणती भाजी बेस्ट?

मेथी, कारली, गवार या भाज्या वजन कमी करण्यात मदत करतात.

हे पण वाचा: दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी काय खावे?

Disclaimer: हा लेख फक्त माहिती आणि जनजागृतीसाठी आहे. आरोग्याविषयी कोणतीही अडचण असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights