Overthinking थांबवण्यासाठी 7 जबरदस्त ट्रिक्स: आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी एक टप्पा येतो जेव्हा आपण डोकं जास्तच चालवतो.
म्हणजे साधं साधं काम असलं तरी त्यावर खूप विचार, काय होईल, काय नको, लोक काय म्हणतील, उद्या कसं होईल… असं करत करत डोकं अक्षरशः गरम होतं. यालाच इंग्रजीत Overthinking असं म्हणतात.
Overthinking मुळे माणसाला ताण येतो, झोप लागत नाही, मन शांत राहत नाही. आयुष्य आनंदी जगायचं असेल, तर सगळ्यात आधी हे जास्त विचार करायचं थांबवायला शिकलं पाहिजे.
चला तर मग पाहूया “Overthinking थांबवण्यासाठी 7 जबरदस्त ट्रिक्स”.
कामाला वेळचं बंधन ठेवा
तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपण एखादं साधं काम सुद्धा करायचं म्हटलं तरी त्यावर तासन्तास विचार करत बसतो.
उदा. एखाद्या मुलाला साधं homework लिहायचं असतं, पण तो पेन धरून तासभर बसतो.
“अरे बापरे, हे बरोबर होईल का? चुका तर नाही होणार ना? सरांना आवडेल का?…” काम काही होत नाही, पण डोकं मात्र भन्नाट वेगानं फिरतं.
यालाच Overthinking म्हणतात. आता यावर उपाय काय करायचा? तर आपण स्वतःला थोडा time limit द्यायचा.
जसं की, “हे मी 15-20 मिनिटांत ठरवतो.” “हे काम मी फक्त अर्ध्या तासात पूर्ण करणार.”
असं मनाशी ठरवलं की डोकं कामावर focus होतं. वेळ संपला की जास्त विचार न करता निर्णय घ्या.
उदा. तुम्ही कपडे धुण्याचं ठरवलंय. “मी फक्त 30 मिनिटं याला देणार.” असं ठरवा आणि मग त्या वेळेत झटपट काम पूर्ण करा.
जास्त विचार केलात तर कपडे धुण्याऐवजी तुम्ही साबण कोणता चांगला, डिटर्जंट महाग आहे का, पाणी कमी पडेल का… अशा उगाचच्या गोष्टींवर डोकं फोडत बसाल.
असं वेळेचं बंधन ठेवलं की फायदा काय होतो? मन शांत राहतं,डोकं ताणून बसत नाही,अनावश्यक विचार थांबतात.आणि तुम्ही काम जास्त productive करता. डोक्याला वेळेचा लगाम घाला, नाहीतर तेच तुम्हाला ओढून नेईल.
हे पण वाचा: मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं?
जास्त रिकामा वेळ व्यर्थ घालू नका
मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे. ज्याला काही काम नाही त्याचं डोकं जास्त भटकतं. रिकामा वेळ म्हणजे ओसाड शेतासारखा असतं , तिथं काहीही उगवायला लागतं, चांगलंही आणि वाईटही.
मोकळा वेळ मिळाला की डोकं आपोआप उगाच विचार करतं,
- “काल काय झालं ते बरं नव्हतं.”
- “उद्या काय होईल?”
- “माझं बरोबर चाललंय का?” अशा हजार चिंता मनात येतात.
पण जरा विचार करा, जर हा वेळ आपण दुसऱ्या चांगल्या गोष्टीत घालवला तर मन उगाच ताण घेणार नाही.
काय करायचं मग?
- थोडं चालायला जा.
- घरातली छोटी-मोठी कामं उरका. भांडी घासली तरी चालतील किंवा अंगण झाडलं तरी.
- पुस्तक वाचा, गाणं ऐका, भजन म्हणा.
- तुमची आवड जोपासा. उदा. चित्र काढणं, गाणी गाणं, झाडांना पाणी घालणं.
यामुळे तुमच्या मनाला काम मिळेल. जेव्हा मन गुंतलेलं राहतं तेव्हा उगाचच्या “negative” विचारांना आत शिरायला जागाच मिळत नाही.
उदाहरण घ्या,एखादा शेतकरी पहाटे उठला की दिवसभर शेतात व्यस्त राहतो. त्याला कधी फिरायला वेळच मिळत नाही. पण शहरात ऑफिसला जाणारे लोक बसून-बसून विचार करतात. कारण त्यांच्याकडे फावला म्हणजेच रिकामा वेळ जास्त असतो.
म्हणूनच जुन्या लोकांनी सांगितलंय, “रिकामं डोकं सैतानाचं घर”.
जास्त रिकामा वेळ नको आणि मिळाला तरी त्याला चांगल्या कामात, चांगल्या सवयींमध्ये गुंतवा. त्यामुळे तुमचं मन निरोगी राहील आणि Overthinking लांब पळेल.
लिहून टाका
आपल्या डोक्यात विचारांचा ट्रॅफिक जाम झाला की , तेव्हा मन एकदम गोंधळून जातं. जसं एखाद्या चौकात सगळ्या गाड्या एकदम अडकल्या की काहीच सुचत नाही, तसंच डोक्यातले विचार एकमेकांवर धडका मारतात.
आता उपाय काय? सगळे विचार कागदावर उतरवा.
उदा…
- “मला नोकरीबद्दल चिंता आहे.”
- “घरचं कर्ज कसं फेडायचं?”
- “मित्राशी भांडण झालंय, ते कसं सुधारायचं?”
हे सगळं लिहून टाका. जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा डोक्यातलं ओझं कमी होतं. मनात साठवलेलं सारं काही कागदावर आलं की आपल्याला हलके वाटते.
याचा फायदा काय होतो?
- लिहिल्यावर आपल्याला समजतं की आपण नेमकं कशावर जास्त विचार करतोय.
- उगाचच मोठे वाटणारे प्रॉब्लेम कधी कधी लिहिल्यावर खूपच छोटे दिसतात.
- कधी कधी आपल्याला उपायसुद्धा लिहिताना सापडतो.
उदा. शेतकरी दादाला पावसाची फार चिंता होती. रोज बसून डोकं खाऊन टाकत होता. एक दिवस त्याने पाटीवर लिहिलं “जर पाऊस नसेल तर विहीर खोदायची, नाही जमलं तर दुसऱ्या पिकाचा विचार करायचा.”
लिहिल्यावर त्याचं मन शांत झालं. कारण आता विचार धावपळ न करता व्यवस्थित दिसू लागले.
डोक्यातलं ओझं लिहिलं की ते अर्धं हलकं होतं.
हे पण वाचा: वेळेचं नियोजन (Time Management) कसं करायचं?
सर्वात वाईट विचार करून मोकळं व्हा
आपल्याला कधी कधी एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती वाटते. उदा. “उद्या इंटरव्ह्यूला गेलो आणि गडबडलो तर काय होईल?”“बिझनेस फेल झाला तर काय होईल?” “लोक माझ्यावर हसले तर काय होईल?”
अशी भीती मनाला कुरतडत राहते. आणि आपण Overthinking करत राहतो.
यावर एक उपाय आहे. नेहमी स्वतःला विचारायचं, “सगळ्यात वाईट झालं तर काय होईल?”
समजा, नोकरी मिळाली नाही, मग काय? तर आपण दुसरी नोकरी शोधू. बिझनेस फेल झाला, तर पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा. लोक हसले, तर थोडा वेळ वाईट वाटेल, पण आयुष्य थांबतं का? नाही न!
जेव्हा आपण “Worst Case” मान्य करतो, तेव्हा मन मोकळं होतं. कारण आता आपल्याला सगळ्यात वाईट झालं तरी काय करायचंय, हे आधीच ठाऊक असतं.
उदा. शेजारचा गण्या मुलगा, तो परीक्षेला खूप घाबरत होता. रात्रीभर डोकं खाऊन बसायचा. मग त्याला कुणीतरी सांगितलं कि, “अरे, नापास झालास तरी जग संपणार नाही. परत वर्षभर शिक आणि पुन्हा परीक्षा दे.”
गण्यानं तो विचार केला आणि त्याचं मन शांत झालं. कारण वाईटातलं वाईट काय होणार? नापास. पण त्यावरही उपाय आहे. सगळ्यात वाईट मान्य केलं की मनावरचं दडपण निम्मं कमी होत.
ध्यान (Meditation) आणि श्वासोच्छ्वास करा
आपलं मन दिवसभर धावतं. कधी कामाकडे, कधी पैशाकडे तर कधी भविष्याकडे. एखादं घड्याळ सारखं चालत राहतं, पण त्या घड्याळाला थोडावेळ थांबवलं, तर आपण त्याचा टिक-टिक आवाजही ऐकू शकतो. तसंच मनालाही थोडा “ब्रेक” द्यायला हवा.
त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ध्यान (Meditation) आणि श्वासोच्छ्वास करा.
हे कसं करायचं?
- दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा.
- शांत जागा शोधा, जसं अंगणात, गच्चीवर किंवा खोलीत.
- डोळे मिटा.
- खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा.
- फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा.
सुरुवातीला दोन मिनिटंही कठीण वाटेल. मन डावीकडे-उजवीकडे पळेल. “गॅस लावला का?”, “फोन कुठं ठेवला?”, “उद्या काय करायचं?”अशा प्रकारची प्रश्न येतील. पण हळूहळू मनाला सराव लागतो.
फायदा काय होईल? मेंदू शांत होतो,ताण कमी होतो, झोप चांगली लागते,मन स्थिर राहतं. जसं अंगण झाडलं की धूळ निघून जाते, तसंच meditation केलं की मनाची धूळ निघून जाते.
हे पण वाचा: दररोज 10 मिनिटे स्वतःसाठी देण्याचे महत्त्व
नकारात्मक विचारांना थांबवा
Overthinking चं खरं मूळ काय आहे माहितीये? ते म्हणजे सतत नकारात्मक विचार करणे.“हे होणार नाही”,“मी चुकणार”, “लोक काय म्हणतील?”, “माझं काही खरं नाही”…
अशा गोष्टींवर आपण तासन्तास विचार करत बसतो. पण खरं सांगायचं तर, या विचारांचा काही उपयोग नसतो आणि हे सर्व फालतू विचार असतात.
उपाय काय? जसा नकारात्मक विचार डोक्यात आला, तसा लगेच स्वतःला विचारा कि. “याचा उपयोग काय?”.
उदा. “मी नोकरीत फेल होईन” अरे पण अजून इंटरव्ह्यूही झालेला नाही. मग आत्ताच चिंता करून काय उपयोग? “लोक काय म्हणतील?”,लोक तर नेहमी काहीतरी बोलणार. ते थांबवता येतं का? मग डोकं खाऊन बसायचं कशाला?
जर विचार निरुपयोगी वाटला, तर तो लगेच सोडून द्या. त्याऐवजी एखादा चांगला विचार मनात आणा. “मी प्रयत्न करणार, मला जमणारच.” “लोक काहीही बोलले तरी मी माझं करणार.”
फायदा काय होतो?
- नकारात्मक विचार कमी झाले की मन हलकं होतं.
- आत्मविश्वास वाढतो.
- आणि Overthinking हळूहळू लांब पळतं.
नकारात्मक विचार हे काळ्या ढगांसारखे आहेत. त्यांना बाजूला सारलं की सुर्यप्रकाश दिसतो.
“Present Moment” मध्ये राहा
मित्रांनो, आपण जास्त विचार कधी करतो माहितीये? जेव्हा आपण भूतकाळ आणि भविष्य यावर अडकून बसतो.“काल असं झालं, ते चुकलं.” “उद्या काय होईल? लोक काय म्हणतील?”
हे विचार मनाला कुरतडतात. पण खरा प्रश्न असा आहे कि, आपण भूतकाळ बदलू शकतो का? नाही! आणि भविष्य आपल्या हातात आहे का? नाही, ते अजून आलंच नाही.
मग आपल्या हातात काय आहे? फक्त आणि फक्त “आत्ता”(Present).
“आत्ता” जगणं म्हणजे काय?: आज आता सध्या तुमच्या हातातला चहा गरम आहे का? जर हो तर त्याचा आस्वाद घ्या. अंगणातल्या झाडावर पक्षी किलबिल करतायत का? ते ऐका. आई-बाबा, बायको, मुलं तुमच्याशी गप्पा मारतायत का? त्या क्षणाचा आनंद घ्या.
असं “आत्ता” जगायला शिकलात, की उगाचचे भूतकाळ-भविष्याचे विचार मनात फिरकतच नाहीत.
उदाहरण..माझ्या गावातील विठ्ठल काका नेहमी म्हणतात, “मी लहानपणी शाळेत चांगलं शिकलो असतो तर आज मोठा झालो असतो.” तो सतत भूतकाळाच्या पश्चात्तापात जगतात.
तर दुसरीकडे माझी मावशी गौरीबाई रोज अंगणात तुळशीला पाणी घालते, पोपटी चिवचिवताना बघते आणि चहा पिताना म्हणते , “किती मजा आहे बघा या क्षणात.”
विचारा बरं, कोण सुखी आहे? भूतकाळ आठवून मन जाळणारा विठ्ठल काका, की आत्ता आनंद घेणारी गौरीबाई? उत्तर सगळ्यांना ठाऊक आहे.
मग “Present Moment” मध्ये राहण्यासाठी काय करायचं?:
- जास्त विचार आला की स्वतःला बोला,“मी आत्ता इथे आहे. हेच माझं खरं आयुष्य आहे.”
- छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या.
- मोबाईलमध्ये, भविष्याच्या टेन्शनमध्ये, किंवा कालच्या भांडणात अडकून राहू नका.
लक्षात ठेवा,“आत्ता”चं आयुष्य आपण जर पूर्ण मनापासून जगलो, तर ना भूतकाळ त्रास देतो, ना भविष्य घाबरवतं.
निष्कर्ष:
Overthinking म्हणजे डोक्याला लागलेला “बग” आहे. संगणकात बग आला की तो काढावा लागतो, नाहीतर मशीन अडकतं. तसंच डोक्यातला हा जास्त विचारांचा बग काढायलाही काही ट्रिक्स आहेत.
- थोडं थांबणं,
- थोडं लिहिणं,
- थोडं कामात मन गुंतवणं,
- थोडं Worst Case मान्य करणं,
- थोडं meditation करणं,
- नकारात्मक विचार सोडणं,
- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे “Present Moment” मध्ये जगणं.
या 7 ट्रिक्स जर खरंच मनापासून पाळल्या, तर तुमचं डोकं हलकं होईल, मन शांत होईल आणि आयुष्य खरंच आनंदी वाटेल.
मंडळी, जर तुम्हालाही Overthinking ची सवय असेल तर आजपासून या 7 ट्रिक्स वापरून बघा. आणि तुमचा अनुभव कमेन्ट मध्ये नक्की सांगा. कारण बदलायची सुरुवात एका छोट्या पावलानेच होते.
FAQ:
1. Overthinking म्हणजे काय?
एखाद्या गोष्टीवर खूपच जास्त विचार करणं पण त्याचा उपयोग न होणं, यालाच Overthinking म्हणतात.
2. Overthinking मुळे काय होतं?
झोप नीट लागत नाही, मन सतत ताणात राहतं, निर्णय घेता येत नाहीत.
3. Overthinking थांबवायचा सोपा उपाय कोणता?
मनातलं सगळं कागदावर लिहून काढा. लिहिल्यावर मन हलकं होतं.
4. Meditation मदत करतं का?
हो, रोज 10 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने Overthinking कमी होतं.
5. Worst Case विचारणं म्हणजे काय?
“सगळ्यात वाईट झालं तर काय?” हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ते मान्य करा. भीती कमी होईल.
6. रिकामा वेळ कसा वापरावा?
चालायला जा, पुस्तक वाचा, घरची छोटी कामं करा. रिकामा वेळ नकारात्मक विचारांना जन्म देतो.
7. Overthinking एकदम थांबेल का?
नाही, पण सरावाने हळूहळू कमी होऊ शकतं.
हे पण वाचा: एकटा राहूनही आनंदी कसं राहू शकतो?
