आरोग्यासाठी वाईट असलेल्या 5 सवयी टाळा: आपण दररोज किती गोष्टी “उद्या बदलू” असं म्हणत म्हणत पुढे ढकलतो? “उद्या व्यायाम सुरू करीन”, “उद्या कमी जंक फूड खाईन”, “उद्या लवकर झोपेन” पण हा ‘उद्या’ कधीच येत नाही. काही गोष्टी पुढे ढकलल्या तरी चालतात, पण आरोग्याच्या बाबतीत वेळ काढणं, सवयी बदलणं आणि काळजी घेणं हे आताच करायला हवं.
कारण एकदा आरोग्य बिघडलं की, ते परत आणण्यासाठी खूप वेळ, पैसे आणि मानसिक ताकद लागते. डॉक्टर, औषधं, चाचण्या, डाएट हे सगळं अचानक आपल्या आयुष्याचा भाग बनतं. आणि आपण विचार करतो “जर मी तेव्हा थोडी काळजी घेतली असती, तर आज हे दिवस बघायला लागले नसते.”
आरोग्य हे एका दिवसात बिघडत नाही.तर ते हळूहळू, दिवसेंदिवस, लहान पण घातक सवयींमुळे बिघडते. सुरुवातीला आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही, पण वय वाढल्यावर त्याचा फटका बसतो. थकवा, सांधेदुखी, श्वास घेण्यास अडचण, पचनाचे त्रास, मानसिक तणाव अशा प्रकारची आजार होतात.
चला तर मग अशा 5 सवयी पाहूया ज्या टाळून आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो.
झोपेकडे दुर्लक्ष करणे
“Netflix ची अजून एक episode पाहतो”, “थोडं WhatsApp ची स्टेटस पाहतो ” किंवा “थोडंसं Instagram स्क्रोल करतो.” असं म्हणता म्हणता रात्रीचे १२-१ कधी वाजतात, समजतच नाही. आपल्याला वाटतं की काही फरक पडत नाही, पण हीच सवय हळूहळू आपलं आरोग्य खात असते.
झोप हि फक्त आराम नाही, तर शरीराची दुरुस्ती प्रक्रिया आहे. रात्री आपण झोपेत असताना मेंदू दिवसभरात जमा झालेला थकवा, तणाव आणि पेशींमध्ये झालेलं नुकसान भरून काढतो. हार्मोन्स संतुलित होतात, पचन सुधारतं, आणि शरीर नवीन दिवसासाठी तयार होतं.
पण झोप कमी झाली की :
- सकाळी उठल्यावर डोळे जड वाटतात
- डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात
- मनात चिडचिड वाढते
- कामाची एकाग्रता कमी होते
- रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते
- स्मरणशक्ती कमी होते
उपाय:
रात्री ७-८ तासांची चांगली झोप घ्या. झोप ही लक्झरी नाही,पण गरज आहे. झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप बंद करा. बेडरूममध्ये अंधार, थंड वातावरण आणि शांतता ठेवा. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, आणि दिवसात थोडं जास्त काम करण्यापेक्षा रात्री शांत झोपेला प्राधान्य द्या.
वारंवार जंक फूड खाणे
चवदार पिझ्झा, गरम बर्गर, कुरकुरीत पॅकेज्ड स्नॅक्स आपल्या जिभेला ते लगेच आवडतं. “फक्त आज खातो,उद्यापासून बंद ” असं आपण स्वतःला समजावतो, पण हे “उद्या” कधीच येत नाही. जंक फूडमध्ये तेल, मीठ, साखर, कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स प्रचंड प्रमाणात असतात.
त्यामुळे:
- वजन वेगाने वाढतं
- कोलेस्टेरॉल वाढून हृदयावर ताण येतो
- पचन बिघडतं
- डायबेटीसची शक्यता वाढते
- त्वचा निस्तेज दिसू लागते
एकदा जंक फूडची सवय लागली की, शरीराला ते addictive पदार्थ पुन्हा हवेसे वाटतात. त्यामुळे healthy जेवण देखील बेचव वाटू लागतं, आणि हळूहळू चांगल्या सवयी बाजूला पडतात.
हे पण वाचा: रात्री झोपण्याआधी हे 9 नियम पाळा आणि निरोगी झोप घ्या
उपाय:
घरचं, ताजं आणि पौष्टिक अन्न खाण्याची सवय लावा. आठवड्यातून एकदाच cheat meal घ्या.(उदाहरण: तुम्ही रोज साखर, तळलेलं, पिझ्झा, बर्गर टाळत असाल… पण रविवारच्या रात्री एकदा पिझ्झा खाल्लात, तर तो cheat meal झाला.) पण त्यालाही प्रमाण ठेवा.
फळं, सुका मेवा, घरचे चिवडे, भाजीपाला यासारखे healthy snacks जवळ ठेवा, जेणेकरून भूक लागल्यावर लगेच जंक फूड कडे हात जाऊ नये. आणि हो जेव्हा चविष्ट पिझ्झा डोळ्यांसमोर येईल, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की “माझं आरोग्य माझ्या जिभेपेक्षा महत्त्वाचं आहे.”
पाणी कमी पिणे
आपल्याला तहान लागली कीच पाणी प्यायची आठवण होते, पण शरीराला पाण्याची गरज सतत असते. पाणी म्हणजे आपल्या शरीराचं इंधन आहे. रक्ताभिसरण, पचन, मेंदूचं काम, त्वचेची आर्द्रता हे सगळं पाण्यावर अवलंबून असतं.
पाणी कमी झालं की:
- त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते
- डोकेदुखी वारंवार होते
- थकवा पटकन येतो
- पचन बिघडतं, बद्धकोष्ठतेची समस्या वाढते
- किडनीवर ताण येतो
शरीरात पाण्याची कमतरता जाणवली की ते आपल्याला तहान लावून संकेत देतं. पण बर्याच वेळा आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो.
उपाय:
दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा आणि दिवसात थोडं-थोडं पाणी पित राहा.
हे पण वाचा: दिवसात किती वेळा पाणी प्यावे आणि कसे प्यावे? संपूर्ण माहिती
तणावाकडे दुर्लक्ष करणे
“मी ठीक आहे” आपण हे वाक्य किती वेळा म्हणतो, पण आतून मनात किती भार असतो हे फक्त आपल्यालाच माहिती असते. कामाचा ताण, घरचं टेन्शन, पैशांची चिंता, नात्यांमधील ताण… हे सगळं मनात साठवून ठेवणं म्हणजे हळूहळू आतून गंज लागणं होय.
तणावाचा दीर्घकालीन परिणाम:
- हृदयाचे आजार
- उच्च रक्तदाब
- झोपेचे विकार
- एकाग्रता कमी होणे
- नैराश्य (डिप्रेशन)
मन हे शरीराइतकंच महत्त्वाचं आहे. जर मन शांत नसेल, तर आरोग्य कितीही चांगलं असलं तरी आनंद मिळत नाही.
उपाय:
दररोज किमान १० मिनिटे deep breathing, ध्यान किंवा चालणे करा. तणावाच्या गोष्टी आपल्या विश्वासू व्यक्तीशी बोलून दाखवा, मनात साठवू नका. आपल्याला आनंद देणारं काम (म्युझिक ऐकणं, वाचन, बागकाम) रोज काही वेळ करा.
व्यायाम टाळणे
“वेळ नाही”, “थकलोय”, “उद्या सुरू करीन” हे बहाणे आपण स्वतःलाच पटवतो. पण व्यायाम न करणं म्हणजे शरीराला हळूहळू कमकुवत होऊ देणं होय.
व्यायाम टाळल्यामुळे :
- स्नायूंची ताकद कमी होते
- लठ्ठपणा वाढतो
- सांधेदुखी, पाठदुखी वाढते
- ऊर्जा कमी होते
- हृदय आणि फुफ्फुसं कमकुवत होतात
शरीर हलत नाही, तेव्हा मनही जड होतं. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो, तर संपूर्ण शरीराच्या देखभालीसाठी असतो.
उपाय:
दिवसातून किमान ३० मिनिटं चालणं, योगा, किंवा साधा स्ट्रेचिंग सुरू करा. सुरुवात छोटी करा. लिफ्ट ऐवजी जिना, वाहनाऐवजी थोडं चालणं. हळूहळू व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा, कारण आरोग्यातली ही गुंतवणूक आयुष्यभर परतावा देते.
निष्कर्ष:
आरोग्य हे एका बँकेच्या खात्यासारखं आहे. जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितकाच जास्त नफा मिळेल.
पण फरक इतकाच की, या बँकेतली गुंतवणूक म्हणजे चांगल्या सवयी आहेत. जसे कि, योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण आणि पाण्याचं सेवन.
मित्रांनो, जर तुम्ही या 5 वाईट सवयी जर आजच सोडल्या, तर उद्या तुम्हाला डॉक्टरांचा नंबर शोधायची गरजच पडणार नाही. कारण शरीर तुमचं आहे, आणि त्याचं संरक्षण करणं ही कुणी दुसरं नाही.तुमची स्वतःची जबाबदारी आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कि चांगल्या सवयी लावायला वेळ लागतो, पण त्याचा फायदा आयुष्यभर होतो. आज पेरलेलं बीज उद्या फळ देणारच मग ते आरोग्याचं बीज का नको पेरायला?
Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहिती व जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्यविषयक बदलाआधी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
FAQ:
1. या सवयी टाळायला सुरुवात केल्यावर परिणाम किती दिवसात दिसतील?
प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, पण साधारण ३-४ आठवड्यांत तुम्हाला ऊर्जा, त्वचेतील बदल आणि एकूण आरोग्यात सुधारणा जाणवेल.
2. झोप किती तास घेणं योग्य आहे?
प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान ७-८ तासांची गुणवत्तापूर्ण झोप घ्यावी.
3. जंक फूड पूर्णपणे बंद करावं का?
शक्य असल्यास पूर्णपणे टाळा, पण जर खायचं असेल तर आठवड्यातून एकदाच cheat meal म्हणून घ्या.
हे पण वाचा: रोज चालण्याचे (Walking) 10 फायदे: वजन कमी, तणाव दूर आणि आयुष्य निरोगी
