चांगल्या सवयी कशा लावायच्या? 8 सोप्पे उपाय जे तुमचं आयुष्य बदलतील: आपलं आयुष्य कशावर आधारलेलं असतं? तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि सवयींवर! आपण दररोज जी कामं करतो, ज्या गोष्टी पुन्हा-पुन्हा करतो, त्या हळूहळू आपल्या जीवनशैलीचा भाग होतात. यालाच आपण सवय म्हणतो. वाईट सवयी जीवन बिघडवतात, तर चांगल्या सवयी आयुष्याला उंचीवर नेतात.
पण आता प्रश्न असा आहे की,चांगल्या सवयी लावायच्या कशा? हा लेख तुम्हाला हाच मार्ग दाखवणार आहे.
चांगल्या सवयींचं महत्त्व
- आरोग्य सुधारतं – वेळेवर झोप, व्यायाम, संतुलित आहार या सवयी शरीर तंदुरुस्त ठेवतात.
- आत्मविश्वास वाढतो – रोज थोडं शिकणं, स्वतःवर प्रेम करणं, वेळेचं नियोजन करणं यामुळे मनोबल वाढतं.
- नातेसंबंध मजबूत होतात – कृतज्ञता व्यक्त करणं, प्रामाणिकपणा ठेवणं या सवयींमुळे समाजात मान मिळतो.
- यश मिळतं – शिस्तबद्ध सवयींमुळे अभ्यास, करिअर किंवा बिझनेस यशस्वी होतो.
चांगल्या सवयी लावण्यासाठी काय करायला पाहिजे ?
लहान सुरुवात करा
बरं, आता सवय लावायची म्हटलं की लोक लगेच मोठं ध्येय ठेवतात. उदा..”मी आता रोज १ तास धावणार”, “मी आता गोड पूर्णपणे सोडणार”, “मी एकदम वेगळं आयुष्य जगणार”.
पण काय होतं माहितीये? अशा मोठ्या गोष्टी सुरुवातीला अंगावर येतात. दोन-तीन दिवस चालतं, मग थकल्यासारखं वाटतं, आणि आपण सोडून देतो.
त्यापेक्षा सुरुवात छोटी करा. “मी रोज फक्त १० मिनिटं चालणार.” “मी रोज फक्त ५ पाने पुस्तक वाचणार.” “मी झोपण्याआधी मोबाईल १५ मिनिटं बाजूला ठेवणार.”
ही छोटी गोष्टी करताना जास्त त्रास होत नाही. हळूहळू ती सवय अंगवळणी पडते. मग आपोआप वेळ वाढवता येतो.
जसं झाड लावलं की आधी छोटंसं रोप असतं. पण पाणी घालून, काळजी घेऊन ते मोठं होतं. तसंच, चांगल्या सवयींच्या छोट्या सुरुवातीने मोठे बदल घडतात.
हे पण वाचा: छोट्या सवयी बदलून आयुष्य कसं सुधारू शकतो?
ठराविक ध्येय ठेवा
“मी आता चांगला माणूस होणार” हे ऐकायला भारी वाटतं, पण त्यात मोजमापच नाही. चांगला माणूस म्हणजे काय? कुठल्या गोष्टीमुळे? किती दिवसात?
म्हणून ध्येय ठोस आणि मोजता येण्याजोगं ठेवा. “मी दररोज २ लिटर पाणी पिणार.” “मी रात्री ११ वाजता झोपणार आणि सकाळी ६ ला उठणार.” “मी आठवड्यातून ३ वेळा व्यायाम करणार.”
अशा ध्येयांना सुरुवात करणं सोपं असतं कारण आपण रोज तपासू शकतो. “आज पाणी प्यायलो का? आज वेळेवर झोपलो का?”
आणखी एक महत्वाची गोष्ट,ध्येय लिहून ठेवा. डायरीत लिहा, मोबाईलमध्ये नोट्स करा, भिंतीवर स्टिकर लावा.
लिहून ठेवलं की ते नेहमी डोळ्यांसमोर राहतं आणि लक्ष विचलित होत नाही.
सातत्य ठेवा
खरं सांगायचं तर सवय लावण्यातलं गुपित म्हणजे सातत्यच आहे. एक-दोन दिवस केलं आणि सोडलं, तर त्याचा काही उपयोग नाही.
उदा… एक दिवस २ लिटर पाणी पिलं, दुसऱ्या दिवशी विसरलात, तिसऱ्या दिवशी परत पिलं असं झालं, तर ती सवय लागत नाही. एक दिवस व्यायाम केला, मग तीन दिवस टाळला. तर शरीराला काहीच फरकच पडत नाही.
मेंदूला नवीन पॅटर्न कळायला वेळ लागतो. संशोधनात असं दिसतं की, जर आपण एखादी नवी गोष्ट २१ दिवस सलग केलं, तर ती हळूहळू ऑटोमॅटिक होते.
म्हणजेच, जर तुम्ही २१ दिवस दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायलात, तर २२ व्या दिवशी ते नैसर्गिक वाटेल.
जर तुम्ही ३० दिवस दररोज १० मिनिटं वाचन केलंत, तर नंतर ते न केल्यास रिकामं रिकामं वाटेल.
सातत्य ठेवण्यासाठी छोटे टिप्स :
- डायरीत “आज पूर्ण केलं ✅” असं लिहा.
- मित्राला सांगा, म्हणजे तो विचारेल, “आज केलंस का?”
- किंवा स्वतःसाठी छोटं बक्षीस ठेवा. “जर मी आठवडाभर सातत्य ठेवलं, तर रविवारला चित्रपट बघणार.”
वातावरण तयार करा
आपण ज्या वातावरणात राहतो, तसं आपलं वागणं होतं. हे अगदी खरं आहे. जर घरात रोज टीव्हीच चालू असेल, तर तुम्हीही आपोआप त्यात गुंतता. जर मित्र सगळे वेळ वाया घालवणारे असतील, तर तुमच्याही सवयी तशाच होतात.
म्हणून तुम्हाला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर पर्यावरण बदललं पाहिजे.
उदाहरणं बघा:
- वाचनाची सवय लावायची आहे? मग पलंगाजवळ, सोफ्यावर किंवा बॅगेत पुस्तक ठेवा. डोळ्यासमोर पुस्तक असेल, तर वाचण्याची आठवण होते.
- मोबाईलचा त्रास कमी करायचा आहे? मग नोटिफिकेशन्स बंद करा, रात्री मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा.
- व्यायामाची सवय लावायची आहे? तर सकाळी उठल्यावर बूट समोर दिसले पाहिजेत.
असं वातावरण बनवलं, तर सवय लावणं सोपं होतं. जसं बियाणं पेरलं की त्याला चांगली माती, पाणी, सूर्यप्रकाश दिला तर झाड लवकर वाढतं, तसंच योग्य वातावरण सवयींना वाढवतं.
हे पण वाचा : जीवनात शिस्त (Discipline) आणण्याचे सोपे मार्ग
स्वतःला बक्षीस द्या
आपला मेंदू असा आहे की तो नेहमी बक्षीस (reward) मिळालं की खुश होतो आणि तीच गोष्ट परत करायला प्रवृत्त होतो.
जर तुम्ही आठवडाभर रोज व्यायाम केला आणि शेवटी रविवारी आवडती मिठाई खाल्ली, तर मेंदू म्हणतो, “अरे वा, ही गोष्ट करून मला गोड खायला मिळालं, परत करूया!”
छोट्या छोट्या बक्षिसांचा वापर करा:
- आठवडाभर व्यायाम केला तर मित्रांसोबत चित्रपट बघा.
- रोज १० पाने पुस्तक वाचलं, तर शनिवार-रविवार आवडता पदार्थ खा.
- महिनाभर सातत्य ठेवलं, तर स्वतःसाठी एखादी छोटी भेटवस्तू घ्या (उदा. नवं पुस्तक, नवा ड्रेस).
या बक्षिसांमुळे आपण कंटाळत नाही आणि सवय पक्की होते. जसं लहान मुलं अभ्यास केला की त्यांना चॉकलेट दिलं, तर ते परत अभ्यासाला बसतात, तसंच मोठ्यांनाही बक्षीस महत्त्वाचं आहे.
वाईट सवयींना पर्याय द्या
फक्त “मी ही वाईट सवय सोडतो” असं म्हणून काही होत नाही. वाईट सवय काढून टाकली, तर त्या जागी नवी चांगली सवय द्यावी लागते. नाहीतर मेंदू रिकामा वाटतो आणि परत जुनी वाईट सवय परत येते.
उदाहरणं बघा :
- मोबाईलवर खूप वेळ घालवायचा असेल, तर त्याऐवजी पुस्तक वाचा किंवा फिरायला जा.
- खूप चहा/कॉफी पिण्याची सवय असेल, तर त्याऐवजी लिंबूपाणी किंवा ग्रीन टी घ्या.
- जास्त टीव्ही बघायची सवय असेल, तर त्याऐवजी घरच्यांसोबत गप्पा मारा किंवा छोटंसं छंद (चित्रकला, गाणं, बागकाम) सुरू करा.
वाईट सवय मोडताना तिला पर्याय देणं म्हणजे जसं काटा काढायला दुसरा काटा वापरतात, तसंच आहे.
सोबत कोणी असू द्या
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकटा असला की लगेच थकतो, कंटाळतो, आणि नवी सवय टिकत नाही. पण जर सोबत कोणी असेल, तर उत्साह दुप्पट होतो.
जसं एखादा शेतकरी एकट्याने पेरणी करताना दमून जातो, पण दोन-चार शेजारी मिळाले की काम झपाट्याने होतं, तसंच सवयींचंही आहे.
काही उदाहरणं बघा:
- फिटनेसची सवय: जर तुम्हाला व्यायाम सुरू करायचा असेल, तर एखादा मित्र शोधा आणि दोघांनी एकत्र चालायला किंवा धावायला सुरुवात करा. एकजण सुट्टी घेतो म्हणाला, तर दुसरा ढकलतो, “चल रे, नुसतं बसू नको.”
- गोड खाणं कमी करायचं असेल: घरच्यांना सांगा, कि “मी आता कमी खातोय, म्हणून मला गोड पुढं नका ठेवू.” घरच्यांचा सपोर्ट असेल, तर सवय पक्की होते.
- अभ्यास/वाचन: दोन-तीन मित्र मिळून “Reading Club” काढा. रोज वाचायचं ठरवा आणि नंतर चर्चा करा. त्यामुळे उत्साह वाढतो.
सोबत कोणी असेल तर उत्साह तयार होते. म्हणजे एकमेकाला जबाबदार ठेवतो. “तू केलंस का?” असं विचारलं की आपणही काम टाळू शकत नाही.
म्हणून नवी सवय लावताना सोबत कोणी तरी जरूर ठेवा. मित्र, कुटुंब किंवा ग्रुप.
संयम ठेवा
आता हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे “संयम”.
लोकांना वाटतं की सवय लावली की लगेच परिणाम दिसेल. दोन दिवस व्यायाम केला, की लगेच वजन कमी होईल.
दोन दिवस ध्यान केलं, की लगेच मन शांत होईल.
पण असं होत नाही. सवय म्हणजे बी लावल्यासारखं आहे. बी पेरलं की दुसऱ्याच दिवशी झाड येतं का? नाही ना! त्याला पाणी, माती, सूर्यप्रकाश द्यावा लागतो. थोडा वेळ लागतो, मगच रोपटं उगवतं.
तसंच सवयींसोबत आहे. किमान २१ ते ३० दिवस तरी सातत्य ठेवलं, तर मेंदूला नवा पॅटर्न समजतो. सुरुवातीला कदाचित कंटाळा येईल, चुका होतील, काही दिवस सुटतीलही. पण धीर धरला, तर हळूहळू ती गोष्ट अंगवळणी पडते.
संयम म्हणजे काय? “आज जमलं नाही, उद्या पुन्हा सुरुवात करतो” हा दृष्टिकोन. थोडं थोडं सुधारत जाणं.
लोक चुकून एक दिवस व्यायाम चुकला, तर म्हणतात – “अरे आता काही होणार नाही.” पण खरं तर असं नाही. एक दिवस सुटला, तर दुसऱ्या दिवशी परत सुरू करा. हेच खरं संयम आहे.
दैनंदिन जीवनात लावायला हव्या अशा चांगल्या सवयी
आरोग्यासाठी :
- सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या
- दररोज ३० मिनिटं चालणं किंवा व्यायाम
- वेळेवर जेवणं
- झोप व्यवस्थित घेणं
मन शांत राहण्यासाठी :
- दररोज १० मिनिटं ध्यान
- दिवसात एकदा “मी कोणकोणत्या गोष्टींसाठी आभारी आहे?” लिहा
- सोशल मीडिया कमी वापरा
काम-शिकण्यासाठी :
- दिवसाची कामांची यादी करा
- आधी महत्वाचं काम करा
- रोज थोडं शिकत राहा
नाती टिकवण्यासाठी :
- छोट्या छोट्या गोष्टींसाठी “धन्यवाद” म्हणा
- खोटं बोलणं टाळा
- कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा
निष्कर्ष :
चांगल्या सवयी म्हणजे आपल्यासाठी सोन्याचा साठा. त्या हळूहळू लावा, सातत्य ठेवा, आणि संयम बाळगा.
लक्षात ठेवा, सवयी माणसाचं भविष्य ठरवतात. वाईट सवयींमुळे आयुष्य बिघडून जातं. पण चांगल्या सवयी अंगी लावल्या, तर आयुष्य सुखाचं, निरोगी आणि आनंदी होतं.
आजच एक तरी चांगली सवय ठरवा आणि सुरुवात करा आणि तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली कमेन्ट मध्ये नक्कीच सांगा.
FAQ :
1. सवय लागायला किती दिवस लागतात?
साधारण २१ ते ३० दिवस लागतात.
2. एकावेळी किती सवयी लावाव्यात?
एकावेळी १-२ पुरेश्या. जास्त सवयी घेतल्यास टिकत नाहीत.
3. वाईट सवय सोडता येते का?
हो! पण तिच्याजागी नवी सवय द्या.
4. सवय पक्की राहण्यासाठी काय करावं?
सातत्य ठेवा, प्रगती लिहून ठेवा आणि कुटुंबाकडून मदत घ्या.
हे पण वाचा: दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी काय खावे?
