वाईट सवयी तोडून चांगल्या सवयी लावण्याचे उपाय: आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही वाईट सवयी असतात.
कुणाला जास्त मोबाईल वापरण्याची सवय, कुणाला उशिरा झोपायची, तर कुणाला सतत गोड खायची. या छोट्या छोट्या सवयी कधी कधी आपल्या आरोग्यावर, मनावर आणि कामावर वाईट परिणाम करतात.
पण आनंदाची गोष्ट म्हणजे कि,जशा वाईट सवयी लागतात तशाच चांगल्या सवयी सुद्धा लागू शकतात. आणि खरं सांगायचं तर चांगल्या सवयी एकदा लागल्या की आयुष्य खूपच सुंदर वाटायला लागतं.
चला तर मग बघूया,वाईट सवयी तोडून चांगल्या सवयी कशा लावायच्या?
आधी स्वतःच्या सवयी ओळखा
माणसाला स्वतःची समस्या कळली नाही तर त्यावर इलाज करायचाच कसा? वाईट सवयी तोडायच्या असतील तर पहिलं पाऊल म्हणजे त्या सवयी ओळखणं होय.
आपल्या आयुष्यात बर्याच गोष्टी आपोआप चालत राहतात. आपण त्याला “हे तर रोजचं आहे” असं मानतो. पण हळूहळू त्या गोष्टी आपल्यावर वाईट परिणाम करू लागतात.
म्हणून रोज स्वतःला साधा प्रश्न विचारा, “ही सवय मला खरंच उपयोगाची आहे का? की माझं आयुष्य बिघडवत आहे?”
उदा:
- उशिरा झोपणं = दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं जड, कामात मन लागत नाही.
- सतत मोबाईल स्क्रोल करणं = वेळ वाया, डोळ्यांना त्रास, मन विचलित.
- जंक फूड खाणं = आरोग्य खराब, पोट बिघडणं, वजन वाढणं.
आपण अशा छोट्या छोट्या सवयींना फारसं महत्त्व देत नाही, पण दीर्घकाळात या सवयीच आपल्याला मागे ओढतात.
म्हणून एक वही काढा आणि त्यावर लिहून ठेवा “माझ्या वाईट सवयी कोणत्या आहेत?” यामुळे आपल्याला आपली चूक नजरेस पडते.
अगदी लहानसहान गोष्टी सुद्धा लिहा. दात घासायचं टाळणं, सकाळी उशिरा उठणं, लोकांशी उगाच वाद घालणं. एकदा का आपण आपल्या सवयी ओळखल्या, की अर्धं काम तिथेच झालं असं समजा.
हे पण वाचा: तणावमुक्त जीवनासाठी Mindfulness चे फायदे
हळूहळू बदल करा
लोक बहुतेक वेळा बदल करायचा प्रयत्न करताना एक मोठी चूक करतात. एकदम सगळं बदलायचं ठरवतात.
उदा: “आजपासून मी चहा पिणार नाही!”,”आता पासून मोबाईलवर नाही जाणार!” पण काय होतं माहितीये? दोन-तीन दिवस आपण निभावतो, मग पुन्हा जुनी सवय सुरू होते.
आणि नंतर मनात अपराधीपणाची भावना येते. “मी तर कधीच बदलू शकत नाही”.म्हणून खरं तंत्र म्हणजे स्वतः मद्धे हळूहळू बदल करणे.
उदा:
1. जर तुम्ही रोज 10 कप चहा पिता, तर उद्यापासून एकदम बंद करू नका.आधी 9 कप करा. मग 8 कप आणि नंतर हळूहळू ५–६ कपांवर या.
2. जर तुम्ही रोज ४ तास मोबाईल स्क्रोल करता, तर एकदम “नो मोबाईल” नका म्हणू. आधी ३ तास करा. मग २.५ तास. हळूहळू तुम्ही १ तासावर येऊ शकता.
3. असं केलं की शरीराला आणि मनाला त्रास होत नाही. बदल नैसर्गिक वाटतो, जबरदस्तीचा नाही. लक्षात ठेवा,
“छोटे-छोटे बदल दीर्घकाळात मोठे परिणाम घडवतात.”
जसं रोपटं लावल्यावर लगेच झाड होत नाही, तसंच सवयी बदलायलाही वेळ लागतो. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं, तर एक दिवस नक्की यश मिळतं.
वाईट सवयीची जागा चांगल्या सवयीने भरा
वाईट सवय थांबवणं हे चांगलं आहे, पण फक्त थांबवलं की रिकामी जागा निर्माण होते. ही जागा जर भरली नाही, तर ती पुन्हा जुन्या सवयीनेच भरते.
उदा: तुम्ही ठरवलं की “आता मी जास्त मोबाईल वापरणार नाही.” ठीक आहे, पण मोबाईलच्या ऐवजी मोकळा वेळ कसा घालवणार? जर उत्तर नसेल, तर दोन-तीन दिवसांनी पुन्हा हात आपोआप मोबाईल कडेच जाईल.
म्हणूनच, वाईट सवय काढून टाकली की त्या जागी नवीन, उपयोगी आणि आनंद देणारी सवय लावली पाहिजे.
काही सोपे पर्याय:
1. मोबाईल स्क्रोल करणं थांबवा, त्याऐवजी हलकंसं पुस्तक वाचा . (पुस्तक वाचल्याने ज्ञान वाढतं, आणि डोळ्यांनाही कमी त्रास होतो.)
2. सिगारेट/तंबाखू सोडा, त्याऐवजी गुळ, सौंफ किंवा ड्रायफ्रूट खा. (तोंडाची चवही बदलते आणि आरोग्यालाही फायदा.)
3. उशिरा झोपायची सवय सोडा, आणि त्याऐवजी रात्री हलकीशी ध्यान-प्रार्थना किंवा रिलॅक्सिंग म्युझिक ऐका. (मन शांत होतं आणि झोप पटकन लागते.)
हे लक्षात ठेवा, वाईट सवयीला थांबवून रिकामी जागा सोडली तर मन पुन्हा तिथेच ओढलं जातं. पण जर ती जागा चांगल्या गोष्टींनी भरली, तर हळूहळू चांगली सवयच आपोआप पक्की होते.
हे पण वाचा: मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं?
एकदम कठोर होऊ नका
बर्याच वेळा लोक जोशात येऊन म्हणतात,”आजपासून ही सवय मी कायमची बंद केली आहे!” हे ऐकायला भारी वाटतं, पण खरं आयुष्यात फार वेळ निभावत नाहीत.
कारण आपण माणसं आहोत, देव नाही. चुकलं तर परत जुन्या सवयींकडे जाण्याची शक्यता असतेच.
उदा: एखाद्याने ठरवलं कि, “मी गोड खाणार नाही.” ठीक आहे, पण जर एखाद्या लग्नात गोड मिळालं आणि तो खाऊन टाकला, तर काय होईल? तो माणूस निराश होईल आणि विचार करेल, “मी कधीच बदलू शकत नाही.”
पण खरं तर चूक होणं हे एक नैसर्गिक आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण त्या चुकल्यानंतर आपण परत उभं राहतो का नाही?
एक छोटं उदाहरण.. जसं लहान मूल चालायला शिकतं, तेव्हा ते कितीदा पडतं. पण प्रत्येक वेळी पडल्यावर उठतं, आणि शेवटी चालायला लागतं. तसंच आपल्या सवयी बदलताना होतं.
म्हणून स्वतःवर खूप कठोर होऊ नका. चुकलं तरी स्वतःला माफ करा, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा.
हाच खरा बदलाचा मार्ग आहे.
लहान-लहान लक्ष्य ठेवा
मोठ्ठं लक्ष्य बघितलं की मनच दडपलं जातं. उदा: “आता पासून मी रोज सकाळी १ तास व्यायाम करणार, धावणार, डाएट पाळणार…” असल्या गोष्टी ऐकायला भारी वाटतात, पण दोन-तीन दिवस निभावतात आणि मग सगळं अर्धवटच राहून जातं.
खरं तंत्र असं आहे, मोठं लक्ष्य मोडून लहान-लहान टप्प्यांमध्ये घ्या.
उदा: “मी आयुष्यभर व्यायाम करणार” असं न म्हणता, “मी पुढचे ७ दिवस रोज फक्त १५ मिनिटं व्यायाम करणार” असं म्हणा. “मी आयुष्यभर गोड खाणार नाही” असं न म्हणता, “या आठवड्यात मी दोनदा गोड टाळणार” असं म्हणा.
असं लहान लक्ष्य ठेवलं की मनात “हे तर मी सहज करू शकतो” असं वाटतं. आणि एकदा ते पूर्ण झालं की आत्मविश्वास वाढतो. मग पुढचं पाऊल आपोआप मोठं होत जातं.
लहान लक्ष्य पूर्ण झालं की स्वतःला थोडं बक्षीस द्या. नवीन पुस्तक, आवडीचा सिनेमा, किंवा फक्त स्वतःला शाबासकी.
यामुळे पुढचं ध्येय गाठायला अजून उर्जा मिळते.
मोठं झाडसुद्धा छोट्या बियाण्यापासूनच उगवतं. तसंच मोठ्या बदलाची सुरुवात ही छोट्या ध्येयांपासूनच होते.
आपल्या मित्र-परिवाराची मदत घ्या
माणूस एकटा असेल तर बदल करणं खूप अवघड जातं. पण जर आपल्याला आपल्यासारखेच साथीदार मिळाले, तर काम अर्धं सोपं होतं.
म्हणूनच चांगली सवय लावताना आपल्या जवळच्या लोकांचा आधार घ्या.
उदा: तुम्ही सिगारेट सोडायचं ठरवलं तर मित्राला बोला, “अरे, मी आता सोडतोय, तू पण मला सपोर्ट कर. माझ्यासमोर सिगारेट ओढू नको.” तुम्ही सकाळी चालायला जायचं ठरवलं तर घरच्यांना सांगा कि, “मला सकाळी उठव रे, नाहीतर माझी झोप लागते.”
असं केल्याने काय होतं?
- तुम्हाला जबाबदारीची जाणीव होते.
- मित्र-परिवार तुमचं मनोबल वाढवतात.
- कधी तुम्ही घसरलात तरी ते तुम्हाला परत उभं करतात.
एवढंच नाही तर कधी कधी आपलेच मित्र किंवा घरचे आपल्यासोबत ती सवय अंगीकारतात सुद्धा. उदा: तुम्ही चालायला सुरुवात केली, तर तुमचा मित्रही म्हणतो, “चल मीही येतो”. मग ते चालणं एक सवय न राहता मजा होऊन जाते.
बदल एकट्याने करणं म्हणजे डोंगर चढण्यासारखं आहे. पण जर सोबत साथीदार असतील, तर तो डोंगर चढणं सुद्धा सोपं आणि मजेदार वाटतं.
स्वतःला बक्षीस द्या
आपल्याला लहानपणी ची एक गोष्ट आठवते का? शाळेत चांगलं लिहिलं, परिक्षेत मार्क्स मिळाले, की आई-वडील किंवा शाळेतील सर छोटं गिफ्ट द्यायचे. एखादा चॉकलेट, खेळणं, किंवा कौतुकाची थाप.
त्या छोट्या गिफ्टमुळे किती भारी वाटायचं ना? अगदी तसंच मोठेपणीही आहे.
चांगली सवय लावली की स्वतःलाच छोटंसं बक्षीस द्या. हे बक्षीस काही फार मोठ्ठं नसावं, अगदी साधं असलं तरी चालतं.
उदा:
1. एक आठवडा मोबाईल कमी वापरलात, तर रविवारच्या दिवशी स्वतःला आवडता कटिंग चहा किंवा छानशी कॉफी पाजून घ्या.
2. १५ दिवस नियमित व्यायाम केला, तर स्वतःसाठी एक नवीन टी-शर्ट घ्या.
3. रात्री उशिरा झोपायची सवय सोडून वेळेवर झोपलात, तर विकेंडला आवडतं गाणं लावून निवांत वेळ काढा.
हे बक्षीस का द्यायचं? कारण मनालाही थोडं कौतुक हवं असतं. जेव्हा मनाला कळतं की, “अरे वा, हे काम केलं तर मला छानशी भेट मिळतेय” तेव्हा मन त्या सवयीशी आपोआप जोडून राहतं.
हे अगदी पाळीव कुत्र्याला शिकवल्यासारखं आहे. जेव्हा तो ऐकतो, तेव्हा त्याला बिस्किट द्यायचं, आणि मग तो पुन्हा ऐकायला लागतो. आपलं मनही तसंच आहे.
म्हणून लक्षात ठेवा, प्रगतीचा आनंद साजरा करा, अगदी लहान असेल तरी. यामुळे पुढचं पाऊल उचलायचं बळ मिळतं.
हे पण वाचा: जीवनात शिस्त (Discipline) आणण्याचे सोपे मार्ग
धीर ठेवा
सवयी बदलणं म्हणजे शेतातलं पीक उगवण्यासारखं आहे.आज बी टाकलं, उद्या लगेच रोप उगवतं का? नाही ना!
त्याला पाणी घालावं लागतं, खत द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो.
तसंच सवयींना बदलायलाही वेळ लागतो.
विज्ञान सांगतं कि, एखादी नवीन सवय पक्की व्हायला २१ दिवस ते ९० दिवस लागू शकतात. म्हणजे तुम्ही जर २-३ दिवसात चमत्कार होईल अशी अपेक्षा केली, तर निराश व्हाल.
उदा:
1. तुम्ही व्यायाम सुरू केला, पण दोन दिवसांनी शरीर दुखलं. लगेच “माझ्याकडून नाही होणार” असं म्हणू नका.
2. तुम्ही मोबाईल कमी वापरायचं ठरवलं, पण कधीतरी पुन्हा हातात गेला. तरी स्वतःला दोष देऊ नका.
खरी गोष्ट ही आहे, बदल हा हळूहळू होतो, एकदम नाही. सवय बदलताना मनात उतार-चढाव येणारच.
कधी वाटेल, “वा! मी तर जबरदस्त करतोय.” तर कधी वाटेल, “हे माझ्यापासून होणारच नाही.”
पण अशा वेळी थोडा धीर ठेवा. जसा शेतकरी पिकावर विश्वास ठेवतो, तसाच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा.
प्रेरणादायी गोष्टी वाचा/पहा
आपल्या मनाला रोज नवी उर्जा हवीच असते. जसं शरीराला अन्न-पाणी लागतं, तसं मनाला प्रेरणा लागते. म्हणून दररोज थोड्या फार प्रमाणात प्रेरणादायी गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या किंवा बघायच्या.
युट्युबवर मोटिवेशनल व्हिडिओ बघा. आवडतं पुस्तक वाचा,अगदी एक-दोन पानं का असेना. मोबाईलवर पॉडकास्ट ऐका , ज्यात चांगल्या गोष्टी, जीवनाचे धडे सांगितलेले असतात.
उदा: तुम्ही सकाळी दिवसाची सुरुवात केली आणि लगेच मोबाईलवर न्यूज, सोशल मीडिया उघडलात, तर मनात नकारात्मक विचार भरतात.
पण जर तुम्ही सकाळी उठून ५ मिनिटं एखादं चांगलं वाक्य, एखादी प्रेरणादायी कथा वाचली, तर तो दिवस वेगळाच रंगतो.
असं केल्याने तुमच्या मेंदूला सतत स्मरण होतं की, “मला चांगलं व्हायचं आहे. मी बदलू शकतो.”
आपण ज्या गोष्टी रोज मनात भरतो, त्या हळूहळू आपल्या कृतीत उतरतात. म्हणून नकारात्मक गोष्टींपेक्षा प्रेरणादायी गोष्टींचा आहार मनाला द्या.
लहान सवयींनी सुरुवात करा
मोठ्या गोष्टी लगेच बदलणं अवघड असतं. म्हणून बदल करायचा असेल तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा.
उदा:
1. रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. ही छोटीशी सवय शरीराला ताजेतवाने करते.
2. झोपायच्या आधी मोबाईल स्क्रोल न करता ५ मिनिटं प्रार्थना करा. मन शांत होतं, झोप चांगली लागते.
3. नाश्ता वेळेवर करा. दिवसाची सुरुवात एनर्जेटिक होते.
या सगळ्या छोट्या सवयी दिसायला अगदी क्षुल्लक असतात, पण हळूहळू मोठा बदल घडवतात.
लहान पावलं टाकली की मोठं अंतर सहज पार होतं. जसं नदीत एकदम उडी मारली तर भीती वाटते, पण हळूहळू पाणी ओलांडत गेलं की पार पोहचता येतं. तसंच, आयुष्यातले बदलही लहान पावलांनी सुरू करा.
निष्कर्ष:
वाईट सवयी तोडणं खरं तर सोपं नसतं. कधी निराशा येते, कधी वाटतं “हे माझ्याकडून होणारच नाही.”पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशक्य काहीच नाही.
फक्त तीन गोष्टी पाळा:
- स्वतःची जाणीव – माझ्या सवयी काय आहेत ते ओळखा.
- छोट्या गोष्टींनी सुरुवात – मोठे नाही तर लहान बदल करा.
- सातत्य – चुकलं तरी परत प्रयत्न करत राहा.
हळूहळू या तीन गोष्टींचा संगम झाला की, तुम्ही नक्कीच यशस्वी होता.
लक्षात ठेवा, “सवयी आधी आपण घडवतो, आणि नंतर सवयी आपलं आयुष्य घडवतात.” तसेच तुमच्या चांगल्या सवयी कोणत्या कोणत्या आहेत कमेन्ट मध्ये नक्कीच सांगा.
FAQ:
1) वाईट सवयी तोडायला किती दिवस लागतात?
विज्ञानानुसार एखादी सवय बदलायला किमान 21 दिवस ते 90 दिवस लागू शकतात. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार वेळ बदलतो, पण सातत्य ठेवलं तर बदल नक्की होतो.
2) वाईट सवयी थांबवण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं आहे?
पहिलं पाऊल म्हणजे आपल्या सवयी ओळखणं. कोणती सवय आयुष्यासाठी उपयोगी आहे आणि कोणती नुकसानकारक, हे समजलं की बदल करणे सोपं होऊन जाते.
3) वाईट सवयी सोडताना निराशा आली तर काय करावं?
चुकलं तरी स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा नव्याने सुरुवात करा. सातत्य आणि धीर ठेवलात तर यश मिळणारच.
4) चांगल्या सवयी लावण्यासाठी सोपा मार्ग कोणता?
मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या सवयींनी सुरुवात करा. उदा: सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं, १० मिनिटं चालणं, झोपायच्या आधी मोबाईल बंद करणं.
5) मित्र-परिवाराचा पाठिंबा खरंच गरजेचा असतो का?
हो, अगदीच. मित्र-परिवाराचा सपोर्ट मिळाला तर बदल करणं सोपं जातं. ते आपल्याला प्रोत्साहन देतात आणि कधी आपण ढेपाळलो तर परत उभं करतात.
6) चांगल्या सवयी लावल्यावर स्वतःला बक्षीस देणं का महत्त्वाचं आहे?
कारण मनाला प्रोत्साहन मिळतं. उदा: एक आठवडा चांगली सवय पाळली तर आवडतं गिफ्ट घ्या किंवा आवडता पदार्थ खा. यामुळे पुढच्या वेळी अजून उत्साहाने प्रयत्न करता येतात.
हे पण वाचा: Overthinking थांबवण्यासाठी 7 जबरदस्त ट्रिक्स
